Relation Finding Read Count : 101

Category : Articles

Sub Category : N/A
        शांत, संथ वाटणारी मृदू   स्वभावाची नदी वाहताना तिचे नयनरम्य दृश्य पाहताना समजते की तिच्या परिसराबरोबर अगदी प्रेमाने एकरूप होऊन एक विशिष्ट नाते बनवत आहे. स्वच्छ पारदर्शक स्वरूप तिचे त्यामध्ये जलचर एकमेकांचा अविभाज्य भाग बनून राहिलेले असतात. दोन्ही किनार्यांच्या बाजूने असणारी झाडे, झुडपे, वेली त्या थंडगार पाण्याच्या व मातीच्या ओलाव्यातून  वर तोंडे काढून मदमस्त वार्यावर डोलणारी त्यांची शेंडे , पाने, फुले यांचे प्रतिबिंब परत त्याच संथ वाहणाऱ्या माई च्या उरात दिसते. चोहु बाजूला असणारा गुलाबी ओलावा , किनार्यापासून काही अंतरावर थाटात असणारी हिरवीगार झाडे , त्यावर असणारे पक्षी , बाजूचे प्राणी, कीटक या सगळ्यांचे एकमेकांबरोबर खुप सुंदर असे नाते असत, खूपच मनमोहक दृष्ट काढावी असे.....
               पण यामध्ये स्थिरता हि कायम नाही. पावसाळा येणे हा त्याचा स्वभाव, तो येतो. नदीला पूर येतो भयाण काळोख बनतो. गुलाबी थंडाव्याची जागा वादळ घेते, संथ वाहणारे पाणी प्रलयकारी रूप घेते, उसंड्या मारते, जणु बाजूच्या परिसरावर जोरदार हल्लाच चढवला आहे असे वाटते. किनार्यावर असणारी ती झाडे-झुडपे त्या प्रलयात मान टाकतात, नाहीशी होतात. दिनचर्या बनवलेले जलचर प्राण सोडतात व किनार्यावर थाटात उभी असणारी झाडे उन्मळून पडतात. पाण्याचा प्रचंड वेग त्याचे विदारक रूप दाखवत त्याची पारदर्शकता नष्ट होऊन, त्याचा गढुळपणा मुळ स्वभाव कि काय असे पाहताच वाटणारी भीती, एका येणाऱ्या पुरात अगोदर असणारी सगळी नाती ओरबाडून पुसून टाकतात. डोळ्यासमोर असणारा तो प्रलय पाहताना क्षणभर सुद्धा त्या नयनरम्य आठवणी येत नाहीत तर फक्त भीती आणि भावना यांचा मन सुन्न करणारा खेळ उभा राहतो.....
                     पूर ओसरतो, पाणी हळूहळू पुन्हा संथ होते. नव्याने पुन्हा नाती जोडली जातात. ती नदी आणि तिचा परिसर पुन्हा प्रेमात पडतात, पुन्हा सुरु होतो मंजुळ स्वर मनमोहक......... पण आता हे पाहताना पाहताक्षणीच जाणीव होते, आठवण येते त्या विदारक प्रलयाची, भयानक स्वरुपाची त्या नात्यांमध्ये आलेल्या वादळाची. अन क्षणभर का असेना त्या सुंदर नदीला पाहण्या अगोदर तो राक्षस रुपी पूर, ते वादळ डोळ्यासमोर उभे राहते. त्याचे वर्ण तसेच मनावर कायम छापले जातात.
                       मनुष्याचे नातेसंबंध देखील असेच काहीसे असतात. त्याचे असलेले प्रेम, ओलावा, जिव्हाळा लोकांमध्ये असलेली एक विलक्षण जवळीक हि त्या पुरासारख्या वादळाने ढवळून निघते. काही नष्ट होतात, काही ताणले जातात. नात्यांमध्ये आलेला प्रलय देखील कालांतराने क्षमतो . नव्याने जीवन वाट चालू होते. पण त्या वादळाने मागे सोडलेल्या खुणा, त्या मनावर झालेले व्रण तसेच ठळक उमटतात आणि वेळोवेळी त्याची जाणीव करून देतात. पुन्हा सुरु होतो नात्यांमधील प्रेम आणि कटुतेचा खेळ...........  
कदाचित तिथे पण तो पावसाळा ऋतू निश्चित असावा. जरी काही काळासाठी दुष्काळ पडला तर पूर येणार नाही मात्र नंतर येणाऱ्या ढगफुटीने किनारा पण शिल्लक राहत नाही.
                  हीच आहे जीवनातील नात्यांची रंगत साखळी स्वीकारणे अपरिहार्य...........

                 

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?